Search This Blog

Sunday, May 27, 2018

ग्रामपंचायतींसाठी सुमारे 82 टक्के मतदान


561 ग्रामपंचायतींसाठी
सुमारे 82 टक्के मतदान
            मुंबई, दि. 27: राज्यातील विविध 31 जिल्ह्यांतील 561 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 174 ग्रामपंचायतीमधील 237 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 82 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत मात्र केवळ दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. पालघर, भंडारा व गोंदिया हे तीन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील मतमोजणी उद्या (ता. 28) होईल. पालघर, भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यांत लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्याच (ता. 28) मतदान होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत आज झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी 4 जून 2018 रोजी होईल.
        आज मतदान झालेल्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशी (कंसात पोटनिवडणूकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे- 4(8), पालघर- 2(9), रायगड- 159(5), रत्नागिरी- (1), सिंधुदूर्ग- 2, नाशिक- 20(7), धुळे- 7, जळगाव- 7(5), अहमदनगर- 70(12), नंदुरबार- (2), पुणे- 80(15), सोलापूर- 3(22), सातारा- 15(4), सांगली- 71(5), कोल्हापूर- 62(11), औरंगाबाद- 4(6), बीड- 2(1), नांदेड- 3(6), उस्मानाबाद- 1(7), परभणी- 1(1), जालना- (3), लातूर- 4(3), हिंगोली- (1), अमरावती- (6), अकोला- 1(4), यवतमाळ- 25(6), वाशीम- (2), बुलडाणा- (3), वर्धा- 14(5), चंद्रपूर- (2), भंडारा- 4(1), गोंदिया- (5) आणि गडचिरोली- (6)  एकूण 561(174).

Thursday, May 24, 2018

नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 30 मे रोजी प्रारूप मतदार याद्या


    नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी
 30 मे रोजी प्रारूप मतदार याद्या
मुंबई, दि. 24: राज्यातील विविध 6 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 12 नगरपरिषदा व नगरपंचायतीतील 13 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 30 मे 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता विधानसभा मतदारसंघाच्या 21 मे 2018 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 30 मे 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. तेव्हापासून त्यावर 4 जून 2018 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 7 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी 11 जून 2018 रोजी; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 13 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. यात राजापूर (जि. रत्नागिरी) नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीचा आणि शेगाव (जि. बुलडाणा) नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्रासाठीच्या निवडणुकीचाही समावेश आहे.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. सहारिया यांनी दिली.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायती: भोर (जि. पुणे), वडगाव (जि. पुणे), मुक्ताईनगर (जि. जळगाव), बार्शीटाकळी (जि. अकोला), वानाडोंगरी (जि. नागपूर), पारशिवनी (जि. नागपूर) आणि शेगाव (जि. बुलडाणा) हद्दवाढ क्षेत्रासाठी.
पोटनिवडणुकीसाठी मतदान होणाऱ्या रिक्त पदांचा नगरपरिषदा/ नगरपंचायतनिहाय तपशील: राजापूर (जि. रत्नागिरी)- अध्यक्ष, जव्हार (जि. पालघर)- 6 ब, पोलादपूर (जि. रायगड)- 16, पंढरपूर (जि. सोलापूर)- 10 ब, वाई (जि. सातारा)- 5 अ, मेढा (जि. सातारा)- 15, निफाड (जि. नाशिक)- 6, श्रीरामपूर (जि. अहमदनगर)- 12 अ, श्रीगोंदा (जि. अहमदनगर)- 2 ब आणि 3 क, नंदुरबार (जि. नंदुरबार)- 16 अ, लोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- 2 आणि मोहाडी (जि. भंडारा)- 12.

सांगली व जळगाव महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्या


सांगली व जळगाव महानगरपालिकेच्या
 प्रारूप मतदार याद्यांची 5 जूनला प्रसिद्धी
मुंबई, दि. 24: सांगली- मीरज- कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी; तसेच वसई- विरार महानगरपालिकेतील रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीकरिता 5 जून 2018 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता विधानसभा मतदारसंघाच्या 21 मे 2018 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 5 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. तेव्हापासून त्यावर 14 जून 2018 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 27 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 30 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. सहारिया यांनी दिली.

Monday, May 7, 2018

राजकीय पक्षांची कार्यशाळा

राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्य घटनेतील 73 व 74 व्या घटना दुरूस्तीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात आयोजित राजकीय पक्षांच्या कार्यशाळेत आयोगाच्या ‘निवडणूक वार्ता’चे प्रकाशन करताना विविध मान्यवर.


उमेदवारांच्या उत्पन्नाचा स्त्रोत नमूद करण्यासारख्या निवडणूक सुधारणा अपेक्षित
     -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 7: निवडणूक लढविताना उमेदवारांनी आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत नमूद करणे, उमेदवाराच्या अर्हतेसंदर्भातील निकषात वाढ करणे, नोटाला सर्वाधिक मते मिळाल्यास पर्यायांचा विचार करणे यासारख्या निवडणूक सुधारणा अपेक्षित आहेत. त्याबाबत व्यापक विचारमंथनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केले.
राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्य घटनेतील 73 व 74 व्या घटना दुरूस्तीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात आयोजित राजकीय पक्षांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुहास पळशीकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना कार्यशाळेसाठी आमंत्रित केले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व मंत्री महादेव जानकरदेखील कार्यशाळेस उपस्थित होते.
घटनेतील 73 आणि 74 व्या दुरूस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता लाभल्याचे सांगून श्री. सहारिया म्हणाले की, याच घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर होऊ लागल्या. या निवडणुका अधिकाधिक पारदर्शक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय व विविध संस्था संघटनांनी सूचविलेल्या निवडणूक सुधारणांबाबत राजकीय पक्षांसोबत संवाद साधणे आवश्यक आहे.
कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना श्री. चन्ने म्हणाले की, लोकशाहीत राजकीय पक्ष अत्यंत महत्वाचा घटक आहे. या घटकाच्या आयोगाकडील अपेक्षा आणि राजकीय पक्षांकडून मतदारांच्या अपेक्षा यावर व्यापक चर्चा करणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील वेगवेगळ्या कायद्यांतील तरतुदी, पक्षांतर्गत लोकशाही यांसारख्या विषयांवर व्यापक चर्चा अपेक्षित आहे.
लोकप्रियतेबरोबर विश्वास महत्वाचा
राजकीय पक्ष: प्रतिमा आणि अपेक्षाया विषयावर बोलताना डॉ. पळशीकर म्हणाले की, राजकीय पक्षांचा सध्या सुकाळ आहे; परंतु लोकप्रियतेबरोबर विश्वास महत्वाचा असतो. सत्ता हे राजकीय पक्षाच्या जीविताचे उद्दिष्ट आहे. मात्र लोकपरमार्थाकडे जायचे की नाही हा मुद्दा निकडीचा आहे. त्यासाठी राजकीय पक्षांना स्वत:हून किमान बंधनांचा स्वीकार करावा लागेल. राजकीय पक्ष देशाचे नियंत्रण करतात. म्हणून त्यांनी स्वत:चेही नियंत्रण करणे लोकशाहीच्या हिताचे आहे.
आयोगाची स्वतंत्र यंत्रणा असावी
निवडणूक आयोग स्वायत्त आणि स्वतंत्र असणे या दोन भिन्न बाबी आहेत, असे नमूद करून डॉ. चौधरी म्हणाले की, आयोगाची क्षेत्रीय स्तरावर स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा असावी. भारतीय प्रशासकीय सेवेच्या धर्तीवर भारतीय निवडणूक सेवा हवी. आयोगाप्रमाणेच राजकीय पक्ष आणि नागरिकांवदेखील लोकशाही मूल्यांच्या बळकटीकरणाची जबाबदारी आहे. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या पूर्तीबाबत गांभीर्यपूर्वक उपाययोजना कराव्यात. निवडणूक न होऊ देता सरपंचपद लिलावाद्वारे निश्चित करण्याचा प्रकारदेखील लोकशाही तत्वांशी विसंगत आहे. तो थांबला पाहिजे.
खुले चर्चासत्र
कार्यशाळेत खुले चर्चासत्रदेखील झाले. या चर्चासत्रात श्री. चन्ने यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले. आरएससीडीचे संचालक भीम रासकर, डॉ. ए. एन. सिद्धेवाड, डॉ. सुनंदा तिडके, श्रीमती अनुया कुवर व डॉ. मृदुल निळे आदी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या प्रा. मानसी फडके यांनी सादरीकरण केले. राज्य निवडणूक आयोगाच्या ‘निवडणूक वार्ता’चेही विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. निळे यांनी सूत्रसंचालन केले. आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे यांनी आभार मानले.

Saturday, May 5, 2018

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आज कार्यशाळा


राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची
मुंबई येथे आज कार्यशाळा
मुंबई, दि. 6: राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्य घटनेतील 73 व 74 व्या घटना दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त उद्या (ता. 7) दुपारी 2 वाजता एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चर्चगेट येथील पाटकर सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा होईल. राजकीय पक्षांची भूमिका, मतदारांच्या अपेक्षा, निवडणूक सुधारणा आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा होईल. आयोगाचे सचिव शेखर चन्ने, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुहास पळशीकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, श्री. भीम रासकर, डॉ. प्रकाश पवार, डॉ. राजेश्वरी देशपांडे, डॉ. मृदुल निळे, डॉ. सुनंदा तिडके, श्रीमती अनुया कुवर, श्रीमती मानसी फडके आदी कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण आणि त्यांच्या निवडणुका वेळेवर घेण्याच्या दृष्टीने झालेली 73 आणि 74 वी घटना दुरुस्ती ऐतिहासिक ठरली आहे. निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात राजकीय पक्षांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 2004 पासून राजकीय पक्षांच्या नोंदणीस सुरुवात केली असून सध्या 247 नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. या सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.