Search This Blog

Thursday, September 21, 2017

नांदेड- वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट

नांदेड- वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत
एका प्रभागात प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा वापर
मुंबई, दि. 21: नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी होणाऱ्या मतदानासाठी एका प्रभागात प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2013 मध्ये दिले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत या यंत्राचा वापर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 400 व्हीव्हीपॅट खरेदी तत्वावर उपलब्ध करून देण्याबाबत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविले होते; त्यानुसार कंपनीने 400 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते; परंतु तांत्रिक अडचणीमुळे खरेदी तत्वावर व्हीव्हीपॅट पुरविण्यास कंपनीने नंतर असमर्थता दर्शविली. मात्र या निवडणुकीत प्रायोगिक तत्वांवर काही व्हीव्हीपॅटच्या वापरास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी, अशी विनंती कंपनीने केली होती.
कंपनीच्या विनंतीचा सखोल विचार करुन नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या एका प्रभागात हे व्हीव्हीपॅट प्रायोगिक तत्वावर वापरण्यास कंपनीला परवानगी देण्याचा निर्णय आयोगाने घेतला. त्यानुसार कंपनीने 70 व्हीव्हीपॅट 20 सप्टेंबर 2017 रोजी नांदेड महानगरपालिकेकडे पाठविले. या महानगरपालिकेच्या एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी या व्हीव्हीपॅटच्या वापरासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी आज मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची व इतर मान्यवरांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीतच सर्वांच्या उपस्थितीत चार सदस्य संख्या असलेल्या 19 प्रभागांतून सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक 2 ची निवड करण्यात आली. या प्रभाग क्र. 2 मधील सर्व मतदान केंद्रांवर आता व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्वावर वापर केला जाणार आहे. या व्हीव्हीपॅटच्या वापराबाबतचे सर्व तांत्रिक प्रशिक्षण व त्यांची देखरेख कंपनीचे अधिकारी महानगरपालिका आयुक्तांशी सल्लामसलत करुन करणार आहेत. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर हे सर्व व्हीव्हीपॅट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया परत घेऊन जाणार आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

Tuesday, September 12, 2017

ग्रामपंचायत: 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला मतदान

ग्रामपंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला मतदान
मुंबई, दि. 12: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात काहीसा बदल करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता 14 ऐवजी 16 ऑक्टोबर 2017 रोजी; तर मतमोजणी 17 ऑक्टोबर 2017 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या सर्वत्रिक निवडणुकांचा दोन टप्प्यांतील कार्यक्रम 1 सप्टेंबर 2017 जाहीर केला होता. त्यानुसार 7 आणि 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार होते; परंतु 14 ऑक्टोबर 2014 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी विनंती विविध घटकांकडून करण्यात आली होती. त्यावर संबंधित विभागीय आयुक्तांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोंदियात दुपारी 3 पर्यंतच मतदान
गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार या जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोर या चार नक्षलग्रस्त तालुक्यांतील मतदानाची वेळ सायंकाळी 5.30 ऐवजी दुपारी केवळ 3 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या ठिकाणीदेखील दुसऱ्या टप्प्यात 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्यात 14 ऐवजी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 41, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग- 325, पुणे- 221, सोलापूर- 192, सातारा- 319, सांगली- 453, कोल्हापूर- 478, नागपूर- 238, वर्धा- 112, चंद्रपूर- 52, भंडारा- 362, गोंदिया- 353 आणि गडचिरोली- 26. एकूण- 3,692. 

Wednesday, September 6, 2017

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान
बृहन्मुंबई, नागपूर, कोल्हापूर व पुण्यातील 5 रिक्तपदांसाठीदेखील मतदान
मुंबई, दि. 6: नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच बृहन्मुंबई, पुणे व नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची मुदत 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 50 हजार 439 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 96 हजार 580 इतकी आहे. एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 41 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2; तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 22 जागा राखीव आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 116’, पुण्यातील  प्रभाग क्र. ‘21अ’ नागपूरमधील प्रभाग क्र. ‘35-अ’ आणि कोल्हापूरमधील प्रभाग क्र. ‘11’ व ‘77’ च्या रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील मतदान होत आहे. या सर्व ठिकाणी 16 सप्टेंबर 2017 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरूवात होईल. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नांदेड- वाघाळा महानगरपालिका आणि पोट निवडणूक होत असलेल्या अन्य महानगरपालिकांच्या संबंधित प्रभागांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ती संपुष्टात येईल. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
निवडणूक कार्यक्रम
·         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे-  16 ते 23 सप्टेंबर 2017
·         नामनिर्देशपत्रांची छाननी-      25 सप्टेंबर 2017
·         उमेदवारी मागे घेणे-                 27 सप्टेंबर 2017
·         निवडणूक चिन्ह वाटप-            28 सप्टेंबर 2017
·         मतदान-                                  11 ऑक्टोबर 2017
·         मतमोजणी-                             12 ऑक्टोबर 2017
·         निकालांची राजपत्रात प्रसिद्धी- 13 आक्टोबर 2017

Friday, September 1, 2017

7,576 ग्रामपंचायतींसाठी 7 आणि 14 ऑक्टोबर रोजी मतदान

राज्यातील 7,576 ग्रामपंचायतींसाठी 7 आणि 14 ऑक्टोबर रोजी मतदान
थेट सरपंचपदासाठीदेखील होणार मतदान
मुंबई, दि. 1: राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 7 आणि 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. यात सदस्यांसह थेट सरपंचपदांच्या निवडणुकांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यात विविध 18 जिल्ह्यांतील 3 हजार 884; तर दुसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 3 हजार 692 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले, की ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत राज्याभरातील सुमारे 8,500 ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आहेत. संविधानातील तरदुदीनुसार मुदत संपण्यापूर्वी त्यांच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे. यापैकी ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 114 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. जानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या 689 आणि नव्याने स्थापित झालेल्या 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम यथावकाश जाहीर करण्यात येईल.
तीन ते चार मते देणे आवश्यक
थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणावर मतदान होत असल्याने आचारसंहितेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल; तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी द्यावी लागतील. पूर्वीप्रमाणेच सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठीदेखील निवडणूक चिन्ह म्हणून मुक्त चिन्हांचा वापर केला जाईल. राजकीय पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नाही.
सरपंचपदासाठी फिकी निळी मतपत्रिका
पहिली मतपत्रिका सरपंचपदाच्या जागेसाठी असेल. सरपंचपदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका निळा असेल. सदस्यपदाच्या मतपत्रिकांचे रंग पूर्वीप्रमाणेच असतील अनुसूचित जातीच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका हिरवा; तर नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा असेल. सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा असेल.
…तर 7 वी उत्तीर्ण आवश्यक
सरपंचपदाची उमेदवार असलेली व्यक्ती 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास किमान 7 वी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना 7 वी इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने तसे प्रमाणित करणे आवश्यक राहील.
आचारसंहिता लागू
या सर्व ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. ज्या जिल्ह्यांत एकूण ग्रामपंचायतींपैकी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू असेल. त्याचप्रमाणे ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा तालुक्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहील. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहील; परंतु निवडणूक नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास कामांवर कोणतेही निर्बंध राहणार नाही. त्यांना फक्त निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती करता येणार नाही. निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदानाच्या दिवशी संबंधित ठिकाणी जिल्हाधिकारी स्थानिक सुट्टी जाहीर करतील.
पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. ते 27 सप्टेंबर 2017 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 07 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 9 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. ते 05 ऑक्टोबर 2017 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 14 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी केवळ 3.00 वाजेपर्यंत असेल. या सर्व ठिकाणी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
पहिल्या टप्यात 7 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: नाशिक- 170, धुळे- 108, जळगाव- 138, नंदुरबार- 51, अहमदनगर- 204, औरंगाबाद- 212, बीड- 703, नांदेड- 171, परभणी- 126, उस्मानाबाद- 165, जालना- 240, लातूर- 353, हिंगोली- 49, अमरावती- 262, अकोला- 272, यवतमाळ- 93, वाशीम- 287 आणि बुलडाणा- 280. एकूण- 3,884.
दुसऱ्या टप्यात 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 41, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग- 325, पुणे- 221, सोलापूर- 192, सातारा- 319, सांगली- 453, कोल्हापूर- 478, नागपूर- 238, वर्धा- 112, चंद्रपूर- 52, भंडारा- 362, गोंदिया- 353 आणि गडचिरोली- 26. एकूण- 3,692.