Search This Blog

Tuesday, July 25, 2017

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची मतदार यादी 19 ऑगस्टला

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची
  प्रारूप मतदार यादी 19 ऑगस्टला  
मुंबई, दि. 25: नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह बृहन्मुंबई, नागपूर, पुणे आणि कोल्हापूर महानगरपालिकेतील सहा रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 ऑगस्ट 2017 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले, की नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची मुदत 30 ऑक्टोबर 2017 रोजी संपत असल्याने निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. तिचे प्रभागनिहाय विभाजन करून 19 ऑगस्ट 2017 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून 28 ऑगस्ट 2017 पर्यंत या याद्यांवर हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 7 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्याच दिवशी मतदान केंद्रांची यादी; तसेच प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्याही प्रसिद्ध केल्या जातील.
रिक्तपदांसाठी मतदार याद्या
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 116, नागपूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 35अ, कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 11 व 77 आणि पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 21अ व 39अ या जागा रिक्त आहेत. या सहापैकी तीन जागा सदस्यांच्या निधनामुळे; तर तीन जागा संबंधित सदस्यांचे जातप्रमाणत्र अवैध ठरल्याने रिक्त झाल्या आहेत. या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने लेखनिकांच्या चुका असल्यास, प्रभाग बदलला असल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही प्रभागनिहाय मतदार यादीत नाव नसल्यास अशा चुकांबाबत कार्यवाही केली जाईल; तसेच मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित मतदान केंद्रांवरील सेवासुविधांची खात्री करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रे तळमजल्यावर असावीत. अपवादात्मक स्थितीत पहिल्या मजल्यावर असल्यास उद्‌वाहन (लिफ्ट) किंवा डोलीची व्यवस्था करावी. वीज, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, सावली, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर इ. सुविधादेखील उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

Thursday, July 20, 2017

शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन


मुंबई विद्यापीठातील परिषदेसाठी
शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 20: भारतीय राज्य घटनेतील 73 व 74 व्या दुरूस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात होणाऱ्या दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेसाठी 15 ऑगस्ट 2017 पर्यंत शोधनिबंध पाठवावेत, असे आवाहन मुंबई विद्यापीठ आणि पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
राज्य‍ निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने व राज्य शासनाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग आणि गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेतर्फे ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठात 14 ते 16 सप्टेंबर 2017 या कालावधीत ही दोन दिवशीय परिषद होईल. परिषदेचा मुख्य विषय ‘73 आणि 74 व्या घटना दुरूस्तीची 25 वर्षे: प्रगती आणि पुढील वाटचाल’ असा आहे. त्या अनुषंगाने भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात प्रश्न, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य‍ संस्थांच्या निवडणुकांची वैशिष्ट्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचा सहभाग, प्रसारमाध्यमे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इत्यादी विषयांवर संशोधक आपले शोधनिबंध पाठवू शकतात. शोधनिबंध 8 हजार शब्दांपेक्षा जास्त मोठा नसावा. अधिक माहिती www.localdemocracy2017.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Saturday, July 15, 2017

मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान

मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान
                                        -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 15: मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होईल; तर 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, मीरा- भाईंदर महानगरपालिकेची मुदत 27 ऑगस्ट 2017 रोजी संपत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. एकूण 24 प्रभागातील 95 जागांसाठी मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 26 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 या कालावधीत दाखल करता येतील. त्यासाठी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. 3 ऑगस्ट 2017 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2017 पर्यंत असेल. निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांना 7 ऑगस्ट 2017 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 21 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यावर आचारसंहिता संपुष्टात येईल.
मीरा भाईंदर एक दृष्टिक्षेप
·         एकूण लोकसंख्या- 8,09,378
·         मतदार (सुमारे)- 5,93,345
·         एकूण प्रभाग- 24
·         एकूण जागा- 95 (महिला 48)
·         सर्वसाधारण- 64 (महिला 32)
·         अनुसूचित जाती- 4 (महिला 2)
·         अनुसूचित जमाती- 1 (महिला 1)
·         नागरिकांचा मागास प्रवर्ग- 26 (महिला 13)
जि.प. आणि पं.स. च्या रिक्त पदांसाठी मतदान
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या चांदेकासारे (ता. कोपरगाव) निवडणूक विभाग; तसेच पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या पिंपरी बु. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीच्या मोझरी निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 31 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.