Search This Blog

Monday, March 27, 2017

महिला सक्षमीकरणाची गरज

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी
महिला सक्षमीकरणाची गरज
     -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि.  27: राज्यातील सुमारे आठ हजार ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांसंदर्भात इच्छूक महिला उमेदवारांचे निवडणूक प्रक्रिया व ग्रामपंचायत कारभाराच्या दृष्टीने अधिकाधिक सक्षमीकरण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कार्यक्रमाची आखणी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिले आहेत.
ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात आयोगाच्या कार्यालयात नुकतीच बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता, आयोगाचे सचिव शेखर चन्ने, सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, यशदाचे डॉ. अजय सावरीकर, महिला राजसत्ता आंदोलनाचे भीम रासकार, युनिसेफच्या अनुराधा आदी यावेळी उपस्थितीत होते.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्के आरक्षण हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरत आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. आता सर्वच समाज घटकांतील अधिकाधिक महिलांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे. त्यासाठी इच्छूक महिला उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया आणि ग्रामपंचायतीचा कारभार याविषयी माहिती होणे आवश्यक आहे.
 ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय विभाजनात सर्व वस्त्या व वाड्यांचा समावेश झाला पाहिजे. कोणही मतदानापासून किंवा निवडणूक लढविण्यापासून वंचित राहू नये. निवडणुकांच्या वेळी मतदार शिक्षण आणि जागृती केली पाहिजे. संगणकीय प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याबाबत महिला उमेदवारांना प्रशिक्षणदेखील दिले पाहिजे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
महिलांसाठी केवळ 50 टक्के जागा आरक्षित नसून अन्य जागांवरही महिला निवडणूक लढवू शकतात, याबाबत व्यापकप्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत श्री. रासकर यांनी यावेळी व्यक्त केले.  

Wednesday, March 22, 2017

चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेसाठी 19 एप्रिलला मतदान

चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेसाठी 19 एप्रिलला मतदान
21 एप्रिलला मतमोजणी: राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 22: चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होणार असून 21 एप्रिल 2017 रोजी मतमोजणी केली जाईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, मुदत समाप्तीपूर्वी या महानगरपालिकांच्या निवडणुका घेणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेची 29 एप्रिल 2017, लातूर महानगरपालिकेची 20 मे 2017; परभणी महानगरपालिकेची 15 मे 2017 रोजी मुदत संपत आहे. भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या महानगरपालिका निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे 27 मार्च ते 3 एप्रिल 2017 या कालावधीत सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रे रविवारी (ता. 2 एप्रिल) स्वीकारण्यात येतील. 28 मार्च 2017 रोजी गुढी पाडव्याची सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत; परंतु रविवारी (ता. 2 एप्रिल) ती स्वीकारण्यात येतील.
निवडणूक कार्यक्रम
·         नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 27 मार्च ते 3 एप्रिल 2017
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी- 5 एप्रिल 2017
·         उमेदवारी मागे घेणे- 7 एप्रिल 2017
·         निवडणूक चिन्ह वाटप- 8 एप्रिल 2017
·         उमेदवारांची अंतिम यादी- 8 एप्रिल 2017
·         मतदान- 19 एप्रिल 2017 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
·         मतमोजणी- 21 एप्रिल 2017

निवडणुकांसंदर्भातील तपशील
महानगरपालिका
लोकसंख्या
मतदार
एकूण जागा
महिला राखीव
सर्वसाधारण
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
नागरिकांचा मागास प्रवर्ग
चंद्रपूर
3,20,379
3,02,359
66
33
30
13
5
18
लातूर
3,82,940
2,78,374
70
35
38
12
1
19
परभणी
3,07,170
2,12,888
65
33
38
8
1
18
एकूण
10,10,489
7,93,621
201
101
106
33
7
55
धुळे, सांगली- ला पोटनिवडणूक
सांगली- मीरज- कुपवाड महानरपालिकेतील प्रभाग क्र. 22ब, जळगाव महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 24अ आणि कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 46 च्या रिक्तपदासाठीदेखील 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होईल. 21 एप्रिल 20174 रोजी मतमोजणी आहे. नामनिर्देशनपत्रे 27 मार्च ते 3 एप्रिल 2017 या कालावधीत सादर करता येतील.   
जि.प. व पं. स. पोट निवडणूक
धुळे जिल्हा परिषदेच्या शिरूड (ता. धुळे) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर (ता. तेल्हारा) निवडणूक विभागाच्या; तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होणार आहे. 21 एप्रिल 2017 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी 30 मार्च ते 5 एप्रिल 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.
ईव्हीएमच्या वापराबाबत...
        इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्य नसल्याची खात्री इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीकडून करून घेण्यात आली आहे, असे स्पष्ट करून श्री. सहारिया म्हणाले की, या सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषत: महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत विविध तक्रारी आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या. काही जणांनी आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा म्हणजेच वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेलचा (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापर करावा, अशा सूचनाही केल्या आहेत.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 8 ऑक्टोबर 2013 रोजी दिले आहेत. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर या यंत्राचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापर करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे; परंतु या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतात. त्या अनुषंगाने या यंत्रात बदल करण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविण्यात आले होते. त्यांनी आवश्यकतेनुसार प्राथमिक स्वरूपात हे यंत्र तयार केले आहे. त्याचेच प्रात्यक्षिक काल (ता.21) राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आले. या यंत्रांची व निधीची उपलब्धता इत्यादींबाबत सर्वंकष विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे आता लगेच चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचा वापर करणे शक्य होणार नाही, असे श्री. सहरिया यांनी स्पष्ट केले.

Tuesday, March 21, 2017

व्हीव्हीपॅट वापरण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस

मुंबई येथे मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेलचे (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते.
मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र
वापरण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस
     -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 21: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येदेखील वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापरण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे; परंतु त्याबाबतच्या सर्वंकष विचारविनिमयानंतर आगामी निवडणुकांमध्ये त्याच्या वापराबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
आयोगाच्या कार्यालयात मान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी मतदान केल्याची पावती दर्शविणाऱ्या यंत्रांचे उपस्थित प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखविले.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्रामुळे कोणाला मतदान केले याची मतदाराला खात्री करता येते. भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर राज्य निवडणूक आयोग विचार करीत आहे; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतात. त्या अनुषंगाने या यंत्रात बदल करण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविण्यात आले होते. त्यांनी आवश्यकतेनुसार प्राथमिक स्वरूपात हे यंत्र तयार केले आहे. त्याचेच प्रात्यक्षिक आज दाखविण्यात आले.

Saturday, March 18, 2017

सहा महानगरपालिकांच्या मतदार याद्यांवर 20 पर्यंत हरकती

सहा महानगरपालिकांच्या मतदार याद्यांवर
हरकती व सूचनांसाठी 20 पर्यंत मुदत वाढ
                       -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 18: भिवंडी- निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी, चंद्रपूर व पनवेल महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 20 मार्च 2017 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, यापूर्वी देण्यात आलेल्या मतदार यादी कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत 18 मार्च 2017 पर्यंत होती; परंतु लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या (ता. 19) सार्वजनिक सुट्टी असली तरीदेखील हरकती व सूचना स्वीकारण्यात येतील. मुदत वाढ दिल्यामुळे आता प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 24 मार्च 2017 रोजी प्रसिद्ध होतील; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 25 मार्च 2017 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. 

Wednesday, March 8, 2017

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार शक्य नाही

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये
कोणताही फेरफार शक्य नाही
      -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 8: इलेक्ट्रोनिक मदान यंत्रे तयार करतानाच सुरक्षिततेबाबत पुरेशी काळजी घेतलेली  असल्यामुळे या यंत्रात कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल येथे झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत केले.
राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. भिवंडी- निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी, चंद्रपूर व पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूर्मीवर ही बैठक घेण्यात आली. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.
महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये सहकार्य केल्याबद्दल सर्व राजकीय पक्षांचे आभार व्यक्त करून श्री. सहारिया म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने तयार केलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जातात. मतदान यंत्रांसदर्भात आलेल्या तक्रारींबाबत कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालकांसह विविध तज्ज्ञांबरोबरदेखील तपशीलवार चर्चा करण्यात आली आहे. मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेबाबत संपूर्ण दक्षता घेण्यात आली असल्यामुळे त्यात फेरफार करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण केले आहे.
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात आली होती. त्यात कुठलीही नावे राज्य निवडणूक आयोगाने वगळलेली नसल्याचे स्पष्ट करून श्री. सहारिया म्हणाले की, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी, चंद्रपूर व पनवेल महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीदेखील 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. राजकीय पक्ष, उमेदवार व मतदारांच्या सोयीसाठी मतदानाच्या सुमारे तीन ते चार आठवडे आधी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे; तसेच या निवडणुकांसाठीदेखील इच्छूक उमेदवारांसाठी नामनिर्देनपत्रे व शपथपत्रे भरण्यासाठी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे.