Search This Blog

Friday, December 30, 2016

अवैध दारूच्या वाहतूक व विक्रीला प्रतिबंध

वन, पोलिस व तटरक्षक दलाच्या समन्वयातून
अवैध दारूच्या वाहतूक व विक्रीला प्रतिबंध करावा
                        -राज्य निवडणूक आयुक्त
       मुंबई, दि. 30: महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या वेळी अवैध दारूच्या वाहतुकीला व विक्रीला प्रतिबंध घालण्याठी राज्य उत्पादन शुल्क, वन, पोलिस व तटरक्षक दलाने आपसात समन्वय साधून कठोर उपाययोजना कराव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिले आहेत.
          स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आयोगाच्या कार्यालयात नुकतीच बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा, अन्न व औषध प्रशासन आयुक्त हर्षदीप कांबळे, रेल्वे पोलीस आयुक्त निकित कौशिक, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांच्यासह वन, परिवहन, सीमा शुल्क, तटरक्षक दल आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
          श्री. सहारिया यांनी सांगितले की, निवडणुकांच्या काळात शेजारील राज्य किंवा जिल्ह्यांमधून होणारी संभाव्य अवैध दारूची वाहतूक रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. परिवहन विभागाच्या सर्व सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने अवैध दारूच्या तस्करीला प्रतिबंध करावा. कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेवरही नजर ठेवावी.
        अवैध दारू निर्मिती रोखण्यासाठी त्याच्या कच्च्या पदार्थ्यांच्याही वाहतूक व विक्रीबाबत अन्न व औषध प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी. वन विभागाच्या क्षेत्रातही अवैध दारूनिर्मिती होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. समुद्र किनारा, खाडी अथवा खारफुटीच्या वनांच्या परिसरात अवैध दारू निर्मिती किंवा साठा होऊ नये यासाठी सीमा शुल्क विभागाच्या मरीन व प्रिव्हेंटिव्ह शाखेच्या मदतीने तटरक्षक दलाच्या बोटीतून गस्त घालावी, असे निर्देशही श्री. सहारिया यांनी दिले.

Wednesday, December 28, 2016

39 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान

39 ग्रामपंचायतींसाठी
सरासरी 82 टक्के मतदान
          मुंबई, दि.28: राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 39 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी 82 टक्के मतदान झाले.
          सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठिकाणी आजच मतमोजणीस सुरवात झाली. मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 1, नाशिक- 9, अहमदनगर- 1, धुळे- 1, नंदुरबार- 1, पुणे- 6, औरंगाबाद- 1, नांदेड- 1, बीड- 1, यवतमाळ- 3, बुलढाणा- 2, वर्धा- 2 आणि भंडारा- 2. एकूण- 39.

राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ

मुंबई येथील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात
प्रथमच राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ
            मुंबई, दि.28: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार जागृती आणि 73 व 74 व्या राज्यघटना दुरूस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने येथील शिवाजी पार्कवर 26 जानेवारी 2017 रोजी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या हस्ते या चित्ररथाच्या प्रतिकृतीचे आज येथे अनावरण करण्यात आले.
          आयोगाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक, आयोगाचे सचिव शेखर चन्ने, सर ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, अधिव्याख्याता विजय बोंदर आदी उपस्थित होते. 73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचीही स्थापना करण्यात आली. शिवाय आता बृहन्मुंबईसह 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात येत आहे.  

          चित्ररथाचे संकल्पना चित्र सर ज. जी. कला महाविद्यालयाचे असून तेच त्याची निर्मितीही करणार आहेत. चित्ररथाच्या प्रथम दर्शनी भागावर उडत्या श्वेत अश्वाचे शिल्प असेल. ते भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभावरून घेतले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या प्रातिनिधीक स्वरूपात इमारती दर्शविल्या जातील. चित्ररथावर मतदारांना मतदानासाठी आवाहन करणारा जिवंत देखावाही असेल. चित्ररथाच्या मागील बाजूस मोठा एलईडी पडदा असेल. त्यावर मतदार जागृतीसंदर्भातील घोषवाक्य, पोस्टर्स, चित्रे, ध्वनिचित्रफिती दाखविण्यात येतील.

Monday, December 19, 2016

नगरपरिषद, नगरपंचायत निकाल 19 डिसेंबर 2016

21 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2016 रोजी मतदान झाले. त्याचे निकाल 19 डिसेंबर 2016 रोजी जाहीर करण्यात आले.

Sunday, December 18, 2016

तिसऱ्या टप्प्यात 72.76 टक्के मतदान

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या तिसऱ्या टप्प्यात 72.76 टक्के मतदान
       मुंबई, दि. 18: राज्यातील चार जिल्ह्यांतील 19 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी 72.76 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, 212 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका चार टप्प्यांत होत आहेत. आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. या 19 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींच्या सदस्यांच्या एकूण 409 जागांसाठी 1 हजार 947 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. थेट नगराध्यक्ष पदाच्या 19 जागांसाठी 111 उमेदवारांमध्ये लढत झाली. या सर्व ठिकाणी एकूण 5 लाख 16 हजार 478 मतदारांसाठी 683 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व ठिकाणी उद्या (ता. 19 डिसेंबर) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.
राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगरपरिषदेचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता; परंतु न्यायालयाच्या स्थगितीमुळे निवडणूक प्रक्रिया होऊ शकली नाही. त्याचबरोबर देसाईगंज नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील 9-ब या जागेची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार या जागेसाठी आता 22 जानेवारी, 2017 रोजी मतदान होणार आहे, असे श्री.सहारिया यांनी सांगितले.
नगरपरिषदनिहाय झालेल्या मतदानाची प्राथमिक अंदाजानुसार सरासरी टक्केवारी अशी: औरंगाबाद: कन्नड- 77.16, पैठण- 75.73, गंगापूर- 75.56 खुल्ताबाद- 79.77. नांदेड: धर्माबाद- 70.73, उमरी- 72.33, हदगाव- 67.04, मुखेड- 73.66, बिलोली- 69.48, कंधार- 83.12, कुंडलवाडी- 81.46, मुदखेड- 71.45, देगलूर- 74.68, अर्धापूर (न.पं.)- 78.46माहूर (न.पं.)- 78.56. भंडारा: पवनी- 72.69, भंडारा- 66.10, तुमसर- 70.58साकोली- 69.13. गडचिरोली: गडचिरोली- 69.24देसाईगंज- 78.75. एकूण सरासरी- 72.76.

Thursday, December 15, 2016

नगरपरिषद निकाल 15 डिसेंबर 2016

नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबर 2016 रोजी पुणे आणि लातूर जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांसाठी मतदान झाले. त्याची मतमोजणी 15 डिसेंबर 2016 रोजी झाली असून त्याचे पक्षनिहाय बलाबल. 

Wednesday, December 14, 2016

पुणे, लातूर सरसरी 72.18 टक्के मतदान

पुणे, लातूर जिल्ह्यात नगरपरिषदांसाठी
सरसरी 72.18 टक्के मतदान
       मुंबई, दि. 14: राज्यातील पुणे व लातूर या दोन जिल्ह्यांमधील 14 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 72.18 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
राज्यात नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या चार टप्प्यात निवडणुका होत आहेत. दुसऱ्या टप्प्यात आज 14 नगरपरिषदांच्या सदस्यपदाच्या एकूण 324; तर थेट नगराध्यक्ष पदांच्या 14 जागांसाठी मतदारांनी मतदान केले. उद्या (ता. 15) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस सुरवात होईल. निकालानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल.
प्राथमिक अंदाजानुसार नगरपरिषदनिहाय झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी अशी: पुणे जिल्हा: बारामती- 76.59, लोणावळा- 74.75, दौंड- 61, तळेगाव दाभाडे- 68.33, आळंदी- 82.30, इंदापूर- 77.72, जेजुरी- 86.14, जुन्नर- 72.43, सासवड- 74.73 व शिरूर- 73.47. लातूर: जिल्हा: उदगीर- 69.52, अहमदपूर- 68.98, औसा- 75.58 व निलंगा- 67.71. एकूण सरासरी- 72.18.

Wednesday, December 7, 2016

माझ्या भविष्यासाठी मतदान करा!

माझ्या भविष्यासाठी मतदान करा!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे आणि  मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे विविध पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीने पालकांपर्यंत अर्थात मतदारांपर्यंत पोहण्यासाठी किशोरसारख्या मासिकांचाही चांगला उपयोग होऊ शकतो. त्यासंदर्भात किशोरच्या डिसेंबर 2016 च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख...
विद्यार्थांनो!  सांगा बरं, आपल्या गावात- शहरात पाणी, रस्ते, शाळा, पथदिव्यांची व्यवस्था कोण करतं? जाधव सरांनी विचारलं. ते नागरिकशास्त्राचा धडा शिकवत होते.
आमदार खासदारसरकार नगरसेवक लोकप्रतिनिधीग्रामपंचायत... नगरपरिषद..., विद्यार्थ्यांमधून अशी विविध उत्तरे आली.
विद्यार्थ्यांनो, तुम्ही म्हणतायेत ते बरोबर आहे; पण प्रत्येकाचे कार्यक्षेत्र भिन्न असते. आपल्या लोकशाही व्यवस्थेची एक व्यापक रचना आहे. ती कोण बरं सांगू शकेल? सरांनी पुन्हा प्रश्न विचारला. आता मात्र बहुतांश विद्यार्थ्यांचे चेहरे प्रश्नांकित झाले होते. ते सरांच्या लक्षात आलं.
मित्रांनो, घाबरू नका. आज मी तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. सरांच्या स्पष्टीकरणानंतर आता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकतेचे भाव दिसू लागले होते.
            लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही., असा साधा सरळ लोकशाहीचा अर्थ सरांनी सांगितला.
सर लोकांचे राज्य कसं? राज्य तर निवडणुकीत जिंकलेल्यांचं असतं ना! वर्गातील चुणचुणीत विद्यार्थिनी म्हणून ओळख असलेली चार्वी आत्मविश्वानं म्हणाली.
बाळा! राज्य आपल्या सगळ्यांचे असते; पण आपण सर्व जण संसदेत, महानगरपालिका इ. ठिकाणी जाऊन कामकाज पाहू शकत नाही. त्यासाठी निवडणुकीद्वारे आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो. ते आपापल्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने कामकाज करत असतात. म्हणून त्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो. म्हणून लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य.
सर, कुणी एका मोठ्या व्यक्तीनंही लोकशाहीची व्याख्या केली आहे म्हणे? प्रश्नार्थक स्वरुपात प्रवीण उद्‌गारला.
            वर्गभर कटाक्ष टाकत सर म्हणाले, होय प्रवीण, त्यांचं नाव आहे अब्रहाम लिंकन! ‘लोकांसाठी, लोकांनी, लोकांकरिता चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही’, अशी त्यांनी लोकशाहीची व्याख्या केली आहे. लोकशाहीच्या व्याख्या अनेकांनी केल्या आहेत; पण लिंकन यांची व्याख्या खूपच सोपी व अर्थपूर्ण आहे.
लोकशाहीची संकल्पना समजल्याचे भाव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जाणवल्यानंतर सर म्हणाले, मित्रोंनो, आपल्या देशात संसदीय लोकशाही आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेची राज्य, केंद्र आणि स्थानिक अशी त्रिस्तरीय रचना आहे. खासदारांच्या माध्यमातून आपण केंद्रीयस्तरावर संसदेत आपले प्रतिनिधी पाठवतो. राज्यस्तरावर विधानसभेत आमदार आपलं प्रतिनिधित्व करतात; तर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी स्थानिकस्तरावर आपलं प्रतिनिधित्व करतात.
जाधव सरांचं वाक्य संपताच विकास म्हणला, सर, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे का?
सर म्हणाले, बाळा छान प्रश्न विचारलास. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका यांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात. कारण या संस्था म्हणजे स्थानिक स्तरावरील शासन, प्रशासन किंवा सरकार असतं आणि त्यांना आपला कारभार करण्यासाठी पुरेशे अधिकार आहेत. आपल्या राज्य घटनेतील 73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीनंतर त्यांना अधिक बळकटी आणि स्वायतत्ता लाभली आहे.
विद्यार्थांनो!  गावात- शहरात पाणी, रस्ते, शाळा, पथदिव्यांची व्यवस्था कोण करतं?, हा आपला मूळ प्रश्न होता. स्थानिक स्वराज्य संस्थाच ही कामे करत असतात. केंद्र शासन संपूर्ण देशाचा; तर राज्य शासन राज्याचा कारभार बघतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत गावात किंवा शहरात पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण, पथदिव्य, आरोग्य आदी सेवा पुरविल्या जातात.
सर, आपल्या राज्यात किती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत?
आपल्या राज्यात सुमारे 28 हजार ग्रामपंचायती, 34 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या, 233 नगरपरिषदा, 124 नगरपंचायती आणि 27 महानगरपालिका आहेत. मतदानाद्वारे आपण निवडणून दिलेले लोकप्रतिनिधी या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज चालवतात. सरांनी सांगितलेली आकडेवारी ऐकूण ऊर्वी म्हणाली, सर, येवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियमित होतात? आणि त्या कोण घेतं? त्यात कोणाला मतदान करता येतं.
होय, दर पाच वर्षांनी या निवडणुका घेतल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती वेगवगळ्या वेळी संपतात, म्हणून त्यांच्या निवडणुकाही वेगवेगळ्या वेळी; पण मुदत संपण्यापूर्वी होतात. राज्य निवडणूक आयोगामार्फत या निवडणुका घेतल्या जातात.
ऊर्वीला पुन्हा प्रश्न पडला, पण, मतदान कोण करु शकतो?
वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव नोंदविलेल्या नागरिकाला आपापल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येतं. तुम्हाला अजून मतदान करता येणार नाही; पण तुमचे आई- वडिलांसह मतदार यादीत नाव असलेले 18 वर्षावरील आपलल्या सभोवतालचे सर्वजण मतदान करु शकतात. मतदान हा आपला अधिकार आहे. त्याचबरोबर ते आपलं कर्तव्यसुद्धा आहे. हा अधिकार आणि कर्तव्य बजावण्याची आता पुन्हा एकदा संधी आहे. कारण सध्या आपल्या राज्यात 212 नगरपरिषदा व नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मार्चपूर्वी 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 296 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.
सर, पण आम्ही तर मतदार नाही आहोत. विकास म्हणाला.
तुम्ही मतदार नाही आहात; पण तुमचे आई- बाबा तर मतदार आहेत ना. त्यांना या निवडणुकीत आपला हक्क बजवायला सांगा. आपल्या पसंतीच्या योग्य उमेदवाराला मतदान करायला सांगा. कुठल्याही वस्तूच्या किंवा पैशाच्या स्वरुपातील प्रलोभनापेक्षा आमचं भविष्य महत्वाचं आहे. आपल्या मताची किंमत होऊ शकत नाही. ते अनमोल आहे, हेही पालकांना सांगा.
विद्यार्थ्यांच्या बऱ्याच संकल्पना स्पष्ट होऊ लागल्या होत्या. सरांचं शिकवणं सुरु होतं, ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा पाया आहे, हा पाया बळकट करण्यासाठी आपल्या पालकांना नक्की मतदान करायला सांगा. हेदेखील सांगा की, आमच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, सुंदर व स्वच्छ गावासाठी योग्य त्या उमेदवाराला मतदान करा. आपल्या एका मतानेदेखील फरक पडतो. परीक्षेतील एक गूण आपलं भविष्य बदलवू शकतो; तसंच आपल्या एका मतानं गावाचं, शहराचं पर्यायानं देशाचं भविष्य बदलू शकतं., जाधव सर आत्मयतेनं सांगत होते.  
नागरिकशास्त्राचा तास आता संपत आला होता, शेवटी सर म्हणाले, आमच्या भविष्यासाठी मतदान कराच! आणि मतदानानंतर बोटावरील मतदानाच्या निशाणीसह माझ्यासोबत सेल्फीही काढा, असा आग्रह तुम्ही आई- बाबांकडे धराच.
जगदीश मोरे,
जनसंपर्क अधिकारी,
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

Tuesday, December 6, 2016

नगरपरिषद दुसरा टप्पा नामनिर्देनपत्रे

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दुसरा टप्पा
पुणे आणि लातूर जिल्ह्यांत सदस्यपदांसाठी
 1,326 व अध्यक्षपदांसाठी 106 नामनिर्देनपत्रे
 मुंबई, दि.7: नगरपरिषद निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबर 2016 रोजी मतदान होत असलेल्या पुणे आणि लातूर जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांच्या 324 सदस्यपदांच्या जागांसाठी 1 हजार 326; तर थेट नगराध्यक्षपदाच्या 14 जागांसाठी 106 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या सर्व 14 नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी सर्व नामनिर्देनपत्रे संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त झाली आहेत. या सर्व ठिकाणी 14 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबर 2016 रोजी मतमोजणी होईल.
नगरपरिषदनिहाय सदस्यपदांसाठी आणि थेट नगराध्यक्षपदांसाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या अशी (कंसात एकूण जागा): पुणे: बारामती (39)- 171 व 7, तळेगाव- दाभाडे (26)- 51 व 2, लोणावळा (25)- 111 व 6, दौंड (24)- 112 व 9, जुन्नर (17)- 70 व 13, शिरूर (21)- 72 व 5, आळंदी (18)- 57 व 8, सासवड (19)- 53 व 6, जेजुरी (17)- 51 व 5 आणि इंदापूर (17)- 77 व 7. लातूर: उद्‌गीर (38)- 185 व 12, अहमदपूर (23)- 115 व 6, औसा (20)- 101 व 13 आणि निलंगा (20)- 100 व 7. एकूण (324)- 1,326 व 106.

Friday, December 2, 2016

अंतिम मतदार यादी 21 जानेवारीला

महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका 2017
मतदार यादीवर हरकती व सूचनांसाठी 12 पासून 17 जानेवारीपर्यंत मुदत
अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी 21 जानेवारीला
मुंबई, दि. 2: राज्यातील 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीवर 12 ते 17 जानेवारी 2017 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील; तर अंतिम मतदार यादी 21 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाकडून 1 जानेवारी 2017 च्या अर्हता दिनांकावर आधारीत तयार करण्यात येणारी विधानसभा मतदार संघाचीच मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी महानगरपालिकांसाठी प्रभागनिहाय, जिल्हा परिषदांसाठी निवडणूक विभागनिहाय; तर पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय विभागण्यात येईल. भारत निवडणूक आयोगाने 16 सप्टेंबर 2016 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीचे विभाजन 15 डिसेंबर 2016 पर्यंत करण्यात येईल. त्यानंतर ती मतदार यादी संबंधित महानगरपालिका, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळांवर सर्वांच्या माहितीस्तव प्रसिद्ध केली जाईल.
नवीन मतदार नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकानुसार 16 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2016 या कालावधीत नवीन मतदार नोंदणी; तसेच नाव व पत्त्यांतीतील दुरुस्तीसाठी अर्ज मागविले होते. या कालावधीत प्राप्त झालेले अर्ज विचारात घेऊन भारत निवडणूक आयोग 5 जानेवारी 2017 रोजी विधानसभा मतदार संघांची पुरवणी यादी प्रसिद्ध करणार आहे. या पुरवणी यादीचेही महानगरपालिकांसाठी प्रभागनिहाय, जिल्हा परिषदांसाठी निवडणूक विभागनिहाय; तर पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय विभाजन करून ती 12 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केली जाईल. विभाजित करण्यात येणाऱ्या 16 सप्टेंबर 2016 च्या प्रारूप व 5 जानेवारी 2017 च्या पुरवणी मतदार यादीवर 12 ते 17 जानेवारी 2017 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील. 21 जानेवारी 2017 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. भारत निवडणूक आयोगाकडून 5 जानेवारी 2017 रोजी विधानसभा मतदार संघांची पुरवणी यादी प्रसिद्ध करण्याची तारीख बदलल्यास त्यानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठीच्या मतदार यादीच्या कार्यक्रमातही बदल होईल, असे त्यांनी सांगितले.
फक्त याच सुधारणा शक्य...
विधानसभा मतदार संघाच्या यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत अर्ज केलेल्या व त्यास भारत निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या नावांचाच महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्याच मतदार यादीत समावेश असेल. विधानसभेच्या मूळ यादीत कोणत्याही दुरुस्त्या करता येणार नाहीत. विधानसभेच्या मतदार यादीचे विभाजन करताना एखादा मतदार मयत, स्थलांतरित अथवा दुबार आढळल्यास किंवा तशा तक्रारी आल्यास अशा मतदारांच्या नावासमोर केवळ नोंद करण्यात येते. अशा मतदाराचे मतदार यादीत छायाचित्र नसल्यास त्याचे अधिक पुरावे तपासूनच त्याला मतदान करण्याची संधी दिली जाते. त्याचबरोबर मतदार यादीचे प्रभाग, निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणनिहाय विभाजन करताना लेखनिकांकडून चूक झाली असल्यास किंवा वेगळ्याच प्रभागात चुकून नावाचा समावेश झाला असल्यास अशा दुरूस्त्या आक्षेपानंतर करण्यात येतात; तसेच संबंधित विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही ते विभाजित मतदार यादीतून वगळले गेले असल्यास त्याचादेखील समावेश करण्यात येतो, असेही श्री. साहारिया यांनी सांगितले.
निवडणुका होणाऱ्या 10 महानगरपालिकांची नावे अशी: 1) बृहन्मुंबई, 2) ठाणे, 3) उल्हासनगर, 4) नाशिक, 5) पुणे, 6) पिंपरी-चिंचवड, 7) सोलापूर, 8) अमरावती, 9) अकोला आणि 10) नागपूर.
निवडणुका होणाऱ्या जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांची संख्या: 1) रायगड- 15, 2) रत्नागिरी-9, 3) सिंधुदुर्ग- 8, 4) नाशिक- 15, 5) जळगाव- 15, 6) अहमदनगर- 14, 7) पुणे- 13, 8) सातारा- 11, 9) सांगली- 10, 10) सोलापूर- 11, 11) कोल्हापूर- 12, 12) औरंगाबाद- 9, 13) जालना- 8, 14) परभणी- 9, 15) हिंगोली- 5, 16) बीड- 11, 17) नांदेड- 16, 18) उस्मानाबाद- 8, 19) लातूर- 10, 20) अमरावती- 10, 21) बुलडाणा- 13, 22) यवतमाळ- 16, 23) नागपूर- 13, 24) वर्धा- 8, 25) चंद्रपूर- 15 आणि 26) गडचिरोली- 12. एकूण जिल्हा परिषदा- 26 व एकूण पंचायत समित्या- 296.
                           महानगरपालिकांचा तपशील:
·         निवडणूक होणाऱ्या महानगरपालिका- 10
·         एकूण लोकसंख्या- 2,57,19,093
·         एकूण प्रभाग- 490
·         एकूण जागा- 1,268 (महिला 636)
·         सर्वसाधारण- 716 (महिला- 353)
·         अनुसूचित जाती- 171 (महिला 88)
·         अनुसूचित जमाती- 38 (महिला 20)
·         नागरिकांचा मागासप्रवर्ग- 343 (महिला 175)
जिल्हा परिषदांचा तपशील:
·         निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा- 26
·         एकूण लोकसंख्या- 5,26,92,534
·         एकूण जागा- 1,568 (महिला 787)
·         सर्वसाधारण- 781 (महिला 380)
·         अनुसूचित जाती- 200 (महिला 106)
·         अनुसूचित जमाती- 164 (महिला 86)
·         नागरिकांचा मागासप्रवर्ग- 424 (महिला 216) 
पंचायत समित्यांचा तपशील:
·         निवडणूक होणाऱ्या पंचायत समित्या- 296
·         एकूण लोकसंख्या- 5,24,14,683
·         एकूण जागा- 3,116 (महिला 1,558)
·         सर्वसाधारण- 1,574
·         अनुसूचित जाती- 406
·         अनुसूचित जमाती- 308
·         नागरिकांचा मागासप्रवर्ग- 828