Search This Blog

Wednesday, March 7, 2018

जि.प. आणि प.स.साठी 6 एप्रिलला मतदान


विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील
रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 6 एप्रिलला मतदान
मुंबई, दि.07: धुळे, वर्धा व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध बारा पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 6 एप्रिलला मतदान; तर 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 17 ते 22 मार्च 2018 या कालावधीत स्वीकारली जातील. 18 मार्च 2018 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
       जिल्हा परिषद- पोटनिवडणूक होणारे निवडणूक विभाग: 22-चिमठाणे (ता. शिंदखेडा, जि. धुळे), 19-हमदापूर (ता. सेलू, जि. वर्धा) आणि 30-आनाळा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद).
       पंचायत समिती- पोटनिवडणूक होणारे निर्वाचक गण: 61- पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), 87-नगाव (ता. जि. धुळे), 71-साक्री (ता. साक्री, जि. धुळे), 77-तुर्काबाद (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), 60-संवदगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद), 66-सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड), 83-मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड), 77-काटी (ता, तुळजापूर, जि. उस्मानाबाद), 78-सौंदड (ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया), 92-आजंती (ता. हिंगणघाट, जि. वर्धा), 64-घुग्घुस-2 (ता. जि. चंद्रपूर) आणि 22-मानापूर (ता. आरमोरी, जि. गडचिरोली).
निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
·        नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 17 ते 22 मार्च 2018
·        नामनिर्देशनपत्रांची छाननी- 23 मार्च 2018
·        अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 28 मार्च 2018
·        अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 02 एप्रिल 2018
·        मतदानाचा दिनांक- 06 एप्रिल 2018
·        मतमोजणीचा दिनांक- 07 एप्रिल 2018

बृहन्मुंबईसह 7 महानगरपालिकांतील रिक्तपदांसाठी 6 एप्रिलला मतदान


बृहन्मुंबईसह 7 महानगरपालिकांतील
रिक्तपदांसाठी 6 एप्रिलला मतदान
मुंबई, दि. 7: बृहन्मुंबई, नाशिक, सोलापूर, जळगाव, पुणे, अहमदनगर व उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 6 एप्रिलला मतदान; तर 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे 13 ते 20 मार्च 2018 या कालावधीत दाखल करता येतील. 18 मार्च 2018 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 21 मार्च 2018 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 23 मार्च 2018 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 24 मार्च 2018 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 6 एप्रिल 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 7 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग: बृहन्मुंबई- 173, नाशिक- 13-क, सोलापूर- 14-क, जळगाव- 26-ब, पुणे- 22-क, अहमदनगर- 32-ब आणि उल्हासनगर- 17-ब.

Friday, February 9, 2018

लोकशाही पंधरवडा सांगता समारंभ


लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत युवकांचा समावेश आवश्यक
-राज्यपाल चे. विद्यासागर राव
            मुंबई, दि. 9 : लोकशाही बळकटी करणासाठी लोकसहभाग असणे अत्यंत महत्वाचे आहे. या प्रक्रियेत युवकांना सामावून घेणे काळाची गरज असून वाढत्या मोबाईल वापराचा उपयोग त्यासाठी निवडणूक आयोगाने करावा, असे आवाहन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले तर लोकशाही सुदृढ करण्यासाठी राजकीय संस्कृती अधिक प्रगल्भ होणे आवश्यक आहे. निवडणूकांमधील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदान सक्ती करण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले.
            राज्य निवडणूक आयोगातर्फे लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याचा समारोप उद्या होणार असून त्या अंतर्गत आज सह्याद्री अतिथीगृह येथे लोकशाही, निवडणूका आणि सूप्रशासन या विषयावर एकदिवसीय परिषद घेण्यात आली. त्यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी लोकशाही बळकटीकरणासाठी आपली भूमिका मांडली. यावेळी निवडणूक आयोगाचे आयुक्त जे.एस.सहारीया, मुख्य सचिव सुमित मल्लिक, पोलीस महासंचालक सतीश माथूर व्यासपीठावर उपस्थित होते.
            राज्यपाल यावेळी म्हणाले की, लोकशाही जीवनाची दिशा आहे. ती आपल्या देशाची सांस्कृतिक परंपरा आहे. गेली 69 वर्ष प्रत्येक टप्प्यावर लोकशाही सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. महाराष्ट्र देखील या कामी आघाडीवर असून महिलांसाठी 50 टक्के आरक्षणाचा निर्णय घेऊन महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविण्याकरीता एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पैशाचा होणार वापर चिंताजनक असून ते भ्रष्टाचाराचे मूळ आहे. निवडणूक प्रक्रियेत पैशाच्या ताकदीचा वापर वाढला तर सामान्याचा लोकशाहीवरील विश्वास राहणार नाही.
            ग्रामीण भागात मोबाईलचा वापर मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. युवकांमध्ये त्याचे प्रमाण अधिक असून लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत युवकांना सहभागी करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सोशल मीडिया हे योग्य माध्यम आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना, गणेश मंडळे यांच्या मदतीने मतदार नोंदणी आणि मतदान टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लोकसहभाग वाढवून लोकशाही प्रक्रिया बळकट करतानाच गावे स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. कर्नाटक, केरळ राज्यांमध्ये यासाठी अधिक प्रभावीपणे काम सुरु आहे. महाराष्ट्रातही अशाच पद्धतीने उपक्रम राबविण्यासाठी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंना या दोन राज्यांमध्ये अभ्यासाठी पाठवावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
मतदान सक्तीसाठी विचार करणे आवश्यक: मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही बळकटीकरणाकरिता राजकीय संस्कृती अधिक प्रगल्भ होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय तसेच समाजहिताच्या मुद्द्यांवर एकमत घडवता आले पाहिजे. निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणूका पार पडणे आवश्यक आहे. निवडणूकांमध्ये पैशाचा अतिरेकी वापर होतो ही चिंतेची बाब आहे. पैशाचा हा वापर थांबला पाहिजे. लोकशाहीबद्दल आपलेपणाची भावना वाढीस लागली पाहिजे. राज्याच्या कायद्यामध्ये ज्या निवडणुका घेतल्या जातात, त्यामध्ये मतदान सक्ती करता येईल का, याबाबत विचार करणे आवश्यक आहे. काही लोक धोरणात्मक बाबींवर नेहमी बोलत असतात. परंतु ते मतदानाला जात नाहीत. मतदान सक्तीचा विचार यासाठी होणे आवश्यक आहे.
            राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुका घेणे ही दरवर्षीची प्रक्रिया आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित घेता येतील का, असा विचार मांडत मुख्यमंत्री म्हणाले, एकत्रित निवडणुका घेतल्यास निवडणूक आयोग, प्रशासन व पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. निवडणुकांतील गुन्हेगारीकरण ही गंभीर बाब असून गुन्हेगारी प्रवृत्तीला निवडणूक लढण्यापासून रोखले गेले पाहिजे. हे करताना मतदानावर त्याचा विपरीत प्रभाव पडणार नाही याचे देखील दखल घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
            संविधानाने राज्याला जे अधिकार दिले आहेत, त्या अंतर्गत निवडणूक प्रक्रियेत अधिक सुधारणा करण्यासाठी निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी. त्या माध्यमातून याबाबत अभ्यास करुन त्याचा अहवाल शासनाला सादर करावा. जेणेकरुन कायद्यामध्ये अपेक्षित बदल करणे शक्य होईल. गेल्या दोन वर्षात राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरील निवडणुका लोकशाही मुल्यांची जपणूक करीत पार पडल्या त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्य निवडणूक आयोगाचे अभिनंदन केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन कायदा आवश्यक: श्री. सहारिया
            निवडणूक आयुक्त श्री. सहारिया यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 80 टक्के निवडणुका या शांततेत पार पडल्या आहेत. त्या बरोबरच मतदानाचे प्रमाण देखील वाढले आहे. यात विद्यापीठे, गृहनिर्माण संस्था, टॅक्सी व हॉटेल असोसिएशन यांची भूमिका महत्वपूर्ण राहीली आहे. 73 व 74 व्या घटनादुरुस्तीला 25 वर्षे पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये अनेकांनी विविध सूचना मांडल्या. त्यातील एका सूचनेवर तातडीने अंमलबजावणी केली ती म्हणजे 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान लोकशाही पंधरवडा साजरा करण्याची. या वर्षापासून दर वर्षी हा पंधरवडा साजरा केला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन कायदा करणे आवश्यक असल्याचे मत श्री. सहारिया यांनी यावेळी व्यक्त केले. युके येथील एका संस्थेने निवडणूक प्रक्रियेसंदर्भात 167 देशांचा अभ्यास केला. त्यातील पाच विविध विभागांवर आधारित संशोधनानुसार भारताचा क्रमांक 35वा असल्याचे श्री. सहारिया यांनी यावेळी सांगितले.
राज्य निवडणूक आयोगाची भूमिका महत्वाची: मुख्य सचिव
मुख्य सचिव म्हणाले, निवडणुका शांततेत, पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे, त्याचबरोबर प्रत्येक सुजाण नागरिकाने कर्तत्व म्हणून मतदान प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. तळागाळातील लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग महत्वाची भूमिका बजावत आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलीस महासंचालक सतिश माथुर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पडण्याकरिता राज्याचा कायदा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
            कार्यक्रमाची सुरुवात व सांगता राष्ट्रगीताने झाली. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी आभार मानले. या परिषदेस राज्य प्रशासनातील विविध विभागांचे प्रधान सचिव, सचिव, विविध जिल्ह्यातील पोलीस अधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tuesday, December 26, 2017

ग्रामपंचायतींसाठी अंदाजे 82 टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंदाजे 82 टक्के मतदान
मुंबई, दि. 26: राज्यातील विविध 27 जिल्ह्यांतील जानेवारी-फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 671 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 82 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडले. मात्र गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यांत केवळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली असून मतमोजणी 27 डिसेंबर 2017 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदान झालेल्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशी: ठाणे- 25, पालघर- 36, रायगड- 5, रत्नागिरी- 4 सिंधुदुर्ग- 16, जळगाव- 90 नंदुरबार- 13, अहमदनगर- 66, पुणे- 89, सातारा- 11, सोलापूर- 64, सांगली- 5, कोल्हापूर- 10 औरंगाबाद- 2, बीड- 157, नांदेड- 3, परभणी- 2, उस्मानाबाद- 1, जालना- 1, लातूर- 5, अमरावती- 12, अकोला- 3, वाशीम- 2, बुलडाणा- 41, वर्धा- 2, गोंदिया- 2 आणि गडचिरोली- 4. एकूण- 671. 

Wednesday, December 13, 2017

ठाणे जिल्हा परिषदेसाठी 65 टक्के मतदान

ठाणे जिल्हा परिषदेसाठी 65; तर 10 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी 73 टक्के मतदान
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका जागेसाठी 29 टक्के मतदान
मुंबई, दि. 13: ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पाच पंचायत समित्यांसाठी 65 तर; 10 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 72.81 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीसाठी 29 टक्के मतदान झाले असून इतर विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील शांततेत मतदान पार पडले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.  
श्री. सहारिया यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण 52 जागांसाठी मतदान झाले; तसेच त्यांतर्गतच्या शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांच्या एकूण 106 जागांसाठीही मतदान झाले. शेलार निवडणूक विभागातील मतदान केंद्र क्र. 38/6 वर फेरमतदान घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. त्यामुळे शेलार निवडणूक विभाग; तसेच शेलार निर्वाचक गण आणि कोलीवली निर्वाचक गणाची मतमोजणी पुढील आदेश होईपर्यंत करण्यात येऊ नये, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
वाशीम जिल्हा परिषदेच्या पांगरी नवघरे निवडणूक विभागाच्या रिक्त पदासोबतच चाणजे (उरण), माटणे (दोडामार्ग), काथली खु. (नंदुरबार), किल्लारी (औसा), मलकापूर (अकोला) आणि मार्डी (मारेगाव) या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील आज मतदान झाले. या सर्व ठिकाणी उद्या (ता. 14) मतमोजणी होईल.
नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी मतदान
        विविध जिल्ह्यांमधील 6 नगरपरिषदा आणि 4 नगरपंच्यातींच्या सदस्यपदांसाठी आणि अध्यक्षपदासाठी; तसेच पाच नगरपरिषदा व एका नगरपंचायतीतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील आज मतदान झाले, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.  
             नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेले मतदान असे: हुपरी (जि. कोल्हापूर) 85.18, नंदुरबार- 70.93, नवापूर (जि. नंदुरबार)- 66.34, किनवट (जि. नांदेड)- 77, चिखलदरा (जि. अमरावती)- 80.85, पांढरकवडा (जि. यवतमाळ)- 68.56, वाडा (जि. पालघर)- 72.79, शिंदखेडा (जि. धुळे)- 72.59, फुलंब्री (जि. औरंगाबाद)- 75.14 आणि सालेकसा (जि. गोंदिया)- 89.65. सरासरी- 72.81.
         नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: मैंदर्गी (जि. सोलापूर)- 71.83, शहादा (जि. नंदुरबार)- 63.50, अंबाजोगाई (जि. बीड)- 78.61, जिंतूर (जि. परभणी)- 64.42, मंगरूळपीर (जि. वाशीम)- 58.62 आणि एटापल्ली (जि. गडचिरोली)- 74.37. वाडा नगरपंचायत व नंदुरबार आणि नवापूर नगरपरिषदेची मतमोजणी 18 डिसेंबर 2017 रोजी होणार आहे. अन्य सर्व ठिकाणीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांची मतमोजणी उद्या (ता. 14) होईल.
मुंबईत एका जागेसाठी मतदान
               बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.21 च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 29 टक्के मतदान झाले. या जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. येथे एकूण 32 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. 

Tuesday, December 12, 2017

ठाणे जिल्हा परिषदेसह 10 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी आज मतदान

ठाणे जिल्हा परिषदेसह 10 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी आज मतदान
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका जागेसाठीदेखील मतदान
मुंबई, दि. 12: ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पाच पंचायत समित्या; तसेच 10 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 13) मतदान होत आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका जागेसह विविध ठिकाणच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील उद्या मतदान होईल. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या क्षेत्रात एकूण 7 लाख 3 हजार 378 मतदार आहेत. त्यात 3 लाख 25 हजार 932 महिला, 3 लाख 77 हजार 444 पुरूष; तर 2 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी 937 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 53 जागा आहेत. त्यातील खोणी निवडणूक विभागाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता 52 जागांसाठी 152 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शहापूर (जागा 28), मुरबाड (16), कल्याण (12), भिवंडी (42) आणि अंबरनाथ (8) या पाच पंचायत समित्यांच्या एकूण 106 जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी 297 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
वाशीम जिल्हा परिषदेच्या पांगरी नवघरे निवडणूक विभागाच्या रिक्त पदासाठीदेखील उद्या मतदान होत आहे. या एका जागेसाठी 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचबरोबर चाणजे (उरण), माटणे (दोडामार्ग), काथली खु. (नंदुरबार), किल्लारी (औसा), मलकापूर (अकोला) आणि मार्डी (मारेगाव) या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीही उद्या मतदान होईल. या सर्व ठिकाणी 14 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी मतदान
हुपरी (जि. कोल्हापूर), नंदुरबार, नवापूर (जि. नंदुरबार), किनवट (जि. नांदेड), चिखलदरा (जि. अमरावती) आणि पांढरकवडा (जि. यवतमाळ) या नगरपरिषदा; तसेच वाडा (जि. पालघर), शिंदखेडा (जि. धुळे), फुलंब्री (जि. औरंगाबाद) आणि सालेकसा (जि. गोंदिया) या नगरपंचायतींच्या सदस्यपदांसह अध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीसाठीदेखील उद्या मतदान होईल. त्याचबरोबर मैंदर्गी (जि. सोलापूर), शहादा (जि. नंदुरबार), अंबाजोगाई (जि. बीड), जिंतूर (जि. परभणी), मंगरूळपीर (जि. वाशीम) आणि एटापल्ली (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीही उद्या मतदान होत आहे. मतदान होत असलेल्या सर्व ठिकाणी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका आदींना सुट्टी देण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार; तसेच नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेसाठी 17 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे उद्या मतदान होत असलेल्या वाडा आणि नंदुरबार व नवापूरसह या दोन जिल्ह्यांतील सर्व सहा नगरपरिषदा/ नगरपंचायतींची मतमोजणी 18 डिसेंबर 2017 रोजी होईल. अन्य सर्व ठिकाणी 14 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
मुंबईत एका जागेसाठी मतदान
            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.21 च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील उद्या (ता.13) मतदान होत आहे. त्यासाठी 2 उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. एकूण 41 हजार 52 मतदारांसाठी 32 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान होत असलेल्या नगरपरिषदा/ नगरपंचायतींसंदर्भातील तपशील
नगरपरिषद/ नगरपंचायत
प्रभाग
जागा
उमेदवार
एकूण मतदार
मतदान केंद्रे
सदस्यपदासाठी
अध्यक्षपदासाठी
हुपरी
9
18
95
5
21,770
27
नंदुरबार
19
39
111
6
1,00,263
126
नवापूर
10
20
95
6
28,791
38
किनवट
9
18
108
6
23,593
36
चिखलदरा
8
17
42
6
3,906
8
पांढरकवडा
9
19
82
6
23,463
31
वाडा
17
17
79
5
10,918
17
शिंदखेडा
17
17
69
4
20,289
27
फुलंब्री
17
17
45
2
14,124
17
सालेकसा
17
17
59
5
2,715
17
एकूण
132
199
1,222
84
2,49,832
344